हे पंतप्रधानांना शोभत नाही; राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना सुनावलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील जागतिक मराठी संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी मुलाखतीतून ठाकरेंनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलंच सुनावलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असले पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत. त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणे हे एका पंतप्रधानाला शोभत नाही”, असे राज ठाकरे यांनी म्हंटले.

पिंपरी चिंचवडमध्ये प्रकट मुलाखतीवेळी ते म्हणाले की, आज देशाचा पंतप्रधान म्हणून आपण सर्वजण नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहतो. मी 2014 साली काय भाषणे केली हे सर्वांनी काढून बघावीत. तेव्हा मी म्हटलं होतं की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यांकडे विशेष लक्ष द्यावे. पण एका राज्याकडे लक्ष देऊ नये. आजही माझी तीच भूमिका आहे. मला त्याकाळाआपासून आतापर्यंत काही गोष्टी या पटलेल्या नाहीत. त्यामुळे मी 2019 मध्ये लाव रे ते व्हिडिओ कॅम्पेन राबविले.

आज खऱ्या अर्थाने राजकारणात चांगले बदल व्हायला हवेत. एकमेकांच्या विरोधात बसलेले एकत्र कसे आले? पहाटे शपथविधी घेतात ते का? नंतर बदलतात, याचाही आपण सर्वांनी विचार करणे गरजेचा आहे. राजकारण म्हणजे फक्त निवडणुका जिंकणे नाही. राजकारणाला सामाजिक कामाचा आधार लागतो. परिस्थिती बदलायची असेल तर विद्यार्थ्यांनी, युवकांनी राजकारणात यायाला हवे, मी तुमच्या सोबत काम करायला तयार आहे.

2019 मध्ये मी तेच केले : राज ठाकरे 

आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं योग्य नाही. हे पंतप्रधानांना शोभत नाही. यापुर्वी मनमोहनसिंग पंतप्रधान होते. त्यांनी काय पंजाबकडे लक्ष दिले का? पंतप्रधान हे देशाचे असतात. त्यांनी देशाकडे लक्ष दिलं पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असलं पाहिजे. मोदी यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतूक करतो. मोदी यांनी राम मंदिराचा प्रश्न सोडवला आहे. त्यांनी काश्मीरचा प्रश्न सोडवला. त्यामुळे त्यांचे कौतूक केले पाहिजे. परंतु जेथे चुकत आहे, तेथे स्पष्ट विरोध केला पाहिजे. आणि 2019 मध्ये मी तेच केले असल्याचे ठाकरेंनी यावेळी सांगितले.