हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. मला वाटतंय की, या सगळ्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या हे लक्षात आलंय की, जे चाललंय ते बरं चाललंय. कारण, कुठं आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कुणी रस्त्यावर उतरायचं नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा आणि बरं चाललंय सरकाराचं, असे म्हणत राज ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारांवर गंभीर आरोप केले आहेत.
ते पुढे म्हणाले, सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. नुसता ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असं नको. पण जनगणना वगैरे झाल्यावर निवडणुका घ्यायला काही हरकत नाही, असं राज म्हणाले. सरकारकडे यंत्रणा आहे. त्यामुळे मनात आणलं इम्पिरिकल डेटा किंवा जनगणना हे सर्व होऊ शकतं. ती काही कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.