आजपासून अधिवेशन!! सरकारला घेरण्यात विरोधक यशस्वी होणार?? की ठाकरे सरकार विरोधकांना पुरून उरणार?

uddhav thackarey fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून विरोधी पक्ष भाजप वेगवेगळ्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे भाजपचा प्रत्येक वार सडेतोड पध्दतीने परतवुन लावण्यासाठी महाविकास आघाडी सुद्धा सज्ज झाली असून आरोप-प्रत्यारोपांच हे अधिवेशन वादळी होईल यात काही शंका नाही.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपकडून सातत्याने सरकारला लक्ष्य केले जात आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती, अनेक नेत्यांच्या मागे लागलेली ईडी चौकशी, अनिल देशमुख प्रकरण, मराठा आरक्षण,सचिन वाझेला झालेली अटक , तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कारखान्यावर ईडी ने घातलेली जप्ती या अनेक मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी च्या रडारावर असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. परमवीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुख यांना ईडी ने तीनवेळा समन्स बजावला असून अद्याप ते ईडी समोर हजर झाले नाहीत. यावरून देखील विरोधक सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करू शकतात.

तर दुसरीकडे सरकार कडून काही मुख्य प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे.

स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन देखील विरोधकानी सरकार वर तोंडसुख घेतलं होतं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारला लवकरच एमपीएससी परीक्षा घेण्याची विनंती केली. एमपीएससी परीक्षा संदर्भात राज्य सरकार एक समिती गठीत करणार आहे. ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करुन शासनाला अहवाल सादर करणार आहेत, अशी माहिती आता मिळतेय.