कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून, राज्यभरातून मदत पुरवली जात आहे. तसेच विविध पक्षातील नेतेही सर्वोतोपरी मदत करतांना दिसून येत आहे. त्यात शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पूरग्रस्त भागात तळ ठोकून असून, पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे.
दोन्ही जिल्ह्यात आलेल्या पुरानंतर अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेला सर्व प्रकारची मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने अत्यावश्यक वस्तू कोल्हेंच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर तीन ट्रकांमधून हे साहित्य पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आले आहे.
दरम्यान, काल सायंकाळी अमोल कोल्हे यांनी जयसिंगपूर, शिरोळ,उदगाव या पूरग्रस्त भागाला भेट दिली. या ठिकाणी सुरु असलेल्या आरोग्य शिबिराला भेट देत सर्वोतोपरी औषधाची मदत देण्याची घोषणा केली, तसेच शरद सहकारी साखर कारखाना, पद्माराजे हायस्कूल शिरोळ या ठिकाणी वास्तव्यासाठी असलेल्या पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस करून मदत दिली. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे. पुरग्रस्तांच्या खाण्यापिण्याची आणि औषधाची काळजी घ्या, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.