हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी नांदेड येथे मराठा समाजाच्या मूक आंदोलन प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्राबाबत उल्लेख केला. “राज्य सरकारने पाठवलेलं १५ पानांचं पत्र देखील आपण स्वीकारत नसल्याचे खासदार संभाजी राजे भोसले यांनी सांगितले. दरम्यान, समन्वयकांनी हे पत्र फाडले असून याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज नांदेड येथून खासदार संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली. नांदेडमध्ये खासदार संभाजी राजे यांनी आज राज्य सरकारवर तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती टीकाही केली. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी केलेल्या आंदोलनानंतर मला १५ पानांचे पत्र देखील पाठवले आहे. त्यात समाजासाठी काय काय करतोय, हे लिहिले आहे. त्यांनी आंदोलनाची दखल घेतली, ही चांगलीच गोष्ट आहे. पण या १५ पानी पत्रामध्ये अनेक तफावती आहेत.
नांदेडकरांचा नाद करू शकत नाही. त्या मूक आंदोलनाला सगळे मंत्री, आमदार, खासदार आले होते. नासिकच्या आंदोलनालाही लोकप्रतिनिधी आले. ओबीसी समाजाचे मंत्री छगन भुजबळ देखील तिथे आले. आजही खासदार-आमदार आलेत. पालकमंत्री कुठे आहेत? तुम्हाला जर प्रामाणिकपणे हे पत्र द्यायचं होतं, तर पालकमंत्र्यांच्या हातून द्यायचे होते. ते मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आम्ही हे पत्र स्वीकारत नसल्याचेही त्यांनी यावेळी संगितले.