हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (11 एप्रिल) होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत परीक्षा पार पाडली जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व स्तरातील व्यक्तींसोबत चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परिक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं. पण आता ही परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
#MPSC परिक्षेसंदर्भात मला दिवसभर अनेक फोन आले. परीक्षा घेण्याबाबत वेगवेगळी मतं आहेत, पण सध्या परीक्षा होणार हे गृहीत धरून अभ्यास सुरू ठेवा! याबाबतचा योग्य निर्णय सरकारकडून लवकर घेतला जाईल आणि मुलांचा प्रवास व सुरक्षा याबाबतही सरकारकडून पूर्ण दक्षता घेतली जाईल, अशी अपेक्षा करुयात! https://t.co/3mOJFEFsP0
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 6, 2021
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी केली आहे. ‘लॉक डाऊन’ असताना रविवारी (ता.11) होणाऱ्या #MPSC परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसंच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती. असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.