विशेष प्रतिनिधी । दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीचा भार सहन करावा लागणार आहे. कारण, दरवर्षीप्रमाणे एसटी महामंडळाने यावर्षीही १० टक्के भाडेवाढ केली आहे. २४ ऑक्टोबरला मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. ही भाडेवाढ ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत कायम राहिल. भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) आणि शिवशाही (आसन) या बसेसला लागू असेल.
शिवशाही (शयनयान), शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला भाडेवाढ लागू होणार नाही. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात भाडेवाढ केली जाते. याच काळात खाजगी वाहनांचेही भाडे मोठ्या प्रमाणात वाढते.
दरम्यान दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता एसटी महामंडळातर्फे २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे ३,५०० बसेस सोडण्यात येणार आहेत. या लांब पल्ल्याच्या जादा वाहतुकीबरोबरच स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.