परमबीर सिंग यांच्या समोरील अडचणी वाढल्या ; CID कडून चौकशी सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या समोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात दाखल केलेल्या प्रकरणाची चौकशी सीआयडी पथकाकडून सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सीआयडीच्या टीमने तक्रारदार पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

परमबीर सिंग यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तपदावर कार्यरत असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. तसेच भिमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यासोबतच 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

परमबीर सिंग आणि 27 पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करुन हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. सीआयडीकडून या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या असून परमबीर सिंग यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment