मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज प्रथमच घट; काल रात्रीपासून आढळले फक्त ६ रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाशी प्रखर लढा देणाऱ्या राज्य सरकारला दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाची चिंता वाढवणाऱ्या मुंबईतील संसर्ग हळूहळू कमी होत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन किंवा तीन अंकी आकड्यांमध्ये रुग्ण वाढ नोंदवणाऱ्या मुंबईतील बाधितांच्या संख्येत आज प्रथमच घट झाली आहे. काल रात्रीपासून आतापर्यंत मुंबईत फक्त ६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात केवळ ३४ कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 2 हजाराच्यावर गेली असली तरी मुंबई समूह संसर्गाच्या टप्प्यात गेली नसल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. करोनाची लक्षणं असलेल्या नागरिकांवर तातडीनं उपचार करण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी ‘फिव्हर क्लिनिक’ सुरू केले आहेत. तिथं येणाऱ्या रुग्णसंख्येच्या आधारावर महापालिकेनं हा दावा केला आहे.

मुंबईनंतर कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या पुण्यात आहे. नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. ही संख्या २३ आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रातील कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात ४ जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर, ठाण्यात एक बाधित आढळून आला आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३२३६ झाली आहे. मुंबईत रुग्णवाढ घटत असताना पुण्यात तसं काही दिसत नसल्यानं चिंता वाढली आहे. पुण्यात मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. पुण्यात आतापर्यंत ४८ रुग्ण कोरोनामुळं दगावले आहेत. त्यातील एकट्या ससून रुग्णालयात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजही ससूनमध्ये एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment