डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ कार्यक्रमांमुळेच गुजरातमध्ये कोरोना फोफावला; काँग्रेसचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदाबाद । गेल्या फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, हा कार्यक्रम आता कोरोनामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोना पसरला, असा दावा गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनी केला आहे. सध्या गुजरातमधील कोरोनाग्रस्तांची संख्या ६ हजाराच्या पुढे गेली असून साडे तीनशेच्या वर लोकांचा कोरोनानाने मृत्यू झाला आहे. अशा वेळी या संपूर्ण परिस्थितीला ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम कारणीभूत असल्याचा दावा प्रदेश काँग्रेसने केला आहे.

“जागतिक आरोग्य संघटनेनं जानेवारीमध्येच करोनाचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचं आवाहन त्याचवेळी आरोग्य संघटनेनं केलं होतं. मात्र, आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून राजकीय लाभासाठी नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्याला गुजरात सरकारनंही परवानगी दिली. या मोठ्या कार्यक्रमामुळे हजारो परदेशी नागरिक अहमदाबादला आले आणि त्यामुळे करोना पसरला. त्यामुळे यासंदर्भात आम्ही गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. या संपूर्ण कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत” असं प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनी म्हटलं.

दरम्यान, कोरोनाचा महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातला मोठा फटका बसला आहे. गुजरातमध्ये २० मार्च रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. विशेष म्हणजे नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाला महिना झाल्यानंतर हा रुग्ण आढळून आला होता. सध्या गुजरातमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६ हजार २४५ इतकी आहे. तर ३६८ जणांचे संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”