हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही राष्ट्रवादीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांना पाठींबा देत त्यांच्या पाठीशी आपण आणि संपूर्ण पक्ष असल्याची भूमिका मांडली आहे. ” आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असून या राजकीय घडामोडींनंतरही भाजपवाले बिळातून बाहेर यायला तयार नाहीत, याचाच अर्थ महाविकास आघाडी सरकारला धोका नाही. अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शिवसेनेचे आमदार फोडले जात आहेत. मात्र, त्यांना एक सांगत आहोत की, महाविकास आघाडी सरकार अल्पमतात नाही. फ्लोअर टेस्टशिवाय त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकत नाही. ईडीची भीती दाखवून भाजपवाले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेची परिस्थिती हे भाजपचे षड्यंत्र आहे. मात्र, काही झाले तरी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत.
आमच्या पक्षातील नेते अशोक चव्हाण, मी, बाळासाहेब थोरात आम्ही जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटून आलो त्यांच्याशी सर्व गोष्टींवर चर्चा ही केली. आम्ही त्यांना सांगतो कि आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणून, असेही पटोले यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले.