हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिवसेना चिन्ह व पक्षावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाची न्यायालयात लढाई सुरु आहे. या दरम्यान, शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी आहे. अशात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील असंवैधानिक सरकार येत्या 14 तारखेला कोसळणार असल्याचे भाकीत केले आहे.
वाशिम येथे काँग्रेसच्यावतीने अमरावती पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील असंवैधानिक सरकार येत्या 14 तारखेला कोसळणार आहे. ठरल्याप्रमाणे 10 च्या तरतुदीनुसार हे सरकार लवकरच कोसळेल आणि महाराष्ट्रात केव्हाही निवडणुका लागू शकतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनो 2024 ची वाट बघू नका.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्तवलेल्या भाकिताबद्दल आता भाजप व शिंदे गटातील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पहावे लागणार आहे.