हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अजूनही विध्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. “आज ज्यांची मुलं त्या ठिकाणी शिकत आहे त्यांच्या परिवाराला काय वेदना होत असतील हे ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना कळणार नाही. खऱ्या अर्थाने केंद्र सरकार आपल्या देशातील लोक युक्रेनमधून मायदेशी आणण्यात कमी पडलेलं आहे, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे”, अशी टीका पटोले यांनी केली.
नाना पटोले यांनी आज गोंदिया येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, खऱ्या अर्थाने केंद्रातले सरकार आपल्या देशातील लोक युक्रेनमधून मायदेशी आणण्यात कमी पडलेलं आहे, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. तुम्ही तिथले बंकरमधील व्हिडीओ पाहिले असतील. एक मुलगी सांगते की मुलीच गायब करतात तिथून. अशी सगळी परिस्थिती असताना आता देशाचे प्रधानमंत्री जागे झालेत. मी तिथल्या विद्यार्थ्यांसोबत स्वत: बोललोय. मी तिथल्या विद्यार्ध्यांच्या संपर्कात आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयालाही आम्ही अनेकदा कळवले.
पाच राज्यांच्या निवडणुका सुरु झाल्यात. या निवडणुकांच्या कालावधीमध्येच रशियाच्या माध्यमातून सातत्याने युक्रेनमध्ये युद्धाचा इशारा दिला जात होता. तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की बाकीचे देश आपल्या आपल्या पोरांना घेऊन गेले. पण आपल्या देशातून कुठली मदत केली नाही. युक्रेनमधील आपल्या देशातील राजदूत साधा फोन घ्यायला तयार नाहीत, असा आरोप यावेळी पटोले यांनी केला.