नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चॉकलेटचे आमिष दाखवून एका 60 वर्षांच्या नराधमाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केले आहेत. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. नरबा कांबळे असे अत्याचार करणाऱ्या आरोपी नराधमाचे नाव आहे. यानंतर पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हि घटना उघडकीस येताच गावकऱ्यांनी आरोपी नराधमाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून पाच वर्षांच्या बालिकेवर नराधमाकडून शारीरिक अत्याचार करण्यात आले आहेत. या पीडित मुलीचे आईवडील घटनेच्या दिवशी शेताकडे गेले होते. हीच संधी साधत गावातीलच नरबा कांबळेने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. यानंतर पीडित मुलीने हि घटना जेव्हा आपल्या मुलीला सांगितली तेव्हा सगळ्यांना धक्का बसला.
गावकऱ्यांनी आरोपीला दिला चोप
अत्याचार झाल्यानंतर मुलीला रक्तस्त्राव सुरू झाल्याने ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी आरोपी नरबा कांबळेला बेदम मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर पीडित मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नराधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.