Wednesday, June 7, 2023

शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास नांदेड आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कालच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही काँग्रेसचे २२ आमदार फडणवीसांनी तयार ठेवलेत असं म्हंटल होत.

नांदेड येथील धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारवर टांगती तलवार आहे. हे 16 आमदार अपात्र झाले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. नांदेडचे दिग्गज काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपात जाण्याच्या चर्चा सुरु होत्या. यातूनच प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलंय.

यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर देखील टीका केली आहे. राहुल गांधी यांचा भारत जोडोचा उपक्रम चांगला आहे. परंतु, यातून फार काही हाती लागेल असं वाटत नाही. त्यांच्याकडे मुद्देच नाहीत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल. येव्हडच नव्हे तर काँग्रेसमधील नितीमत्ता संपली आहे. दहापिढ्या बसून खातात इतकं त्यांच्याकडे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.