नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड-हैदराबाद महामार्गावर रात्री एक भीषण अपघात घडला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देगलूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खानापूर या ठिकाणी भरधाव ट्रकने एका पादचाऱ्याला चिरडले आहे. या ट्रकचालकाने पादचाऱ्याला 100 फुट ओढत नेले आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात पादचाऱ्याच्या शरीराचे अक्षरशः दोन तुकडे झाले आहेत.
तरूणाचा जागीच मृत्यू, ट्रकचालक फरार
सोमनाथ हंटे असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. मात्र गावकऱ्यांनी या ट्रकचालकाचा पाठलाग करून तेलंगणातून ट्रक ताब्यात घेतले. या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
खानापूर फाटा ठरलाय मृत्यूचा सापळा
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा हे ठिकाण सध्या मृत्यूचा सापळा बनले आहे. नांदेडहून हैद्राबादकडे जाणारी वाहने याच फाट्यावरून जात असतात. तसेच खानापूर फाट्यावर असलेल्या चौकातून मुखेड आणि बिलोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात गाड्या असतात. खानापूर फाटा या ठिकाणी भर चौकात देशी आणि विदेशी मद्य विक्रीची दुकाने आहेत. या दुकानातून दारू पिऊन आल्यानंतर अनेक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूचा सापळा म्हणून खानापूर फाटा अशी ओळख निर्माण झाली आहे.