हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत चर्चेत आहे. शरद पवार यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत देशातील व राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. या मुलाखतीत शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर शरद पवार यांची मुलाखत उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी होती, असा दावा त्यांनी केला आहे.
खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्या मुलाखतीवरून शिवसेनेवर टीका केली आहे. राणे म्हणाले, ”१३ जुलै रोजीच्या मुलाखतीत म्हटलंय, सरकार तिघांचे, संवाद वाढला पाहिजे. म्हणजे संवाद नाही. सामनामधूनच उद्धव ठाकरेंवर टीका की, हे संवाद करत नाहीत. संवाद नाही, हे संजय राऊतच म्हणत आहेत. म्हणजे सामनातून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली, असं माझं म्हणणं आहे. ही जी मुलाखत आहे, ती फक्त राज्यातील गंभीर परिस्थितीवरून जनतेचं दुसरीकडं लक्ष वळवण्यासाठी हे विषय या मुलाखतीत घेतले,” असं राणे म्हणाले.
“देश पातळीवर मोदी यांच्यावर टीका, भाजपावर टीका करण्यात आली. इतके दिवस भाजपा शिवसेना नांदले ना? युती होती ना. तेव्हा कसं पटलं सगळं? आता किती दिवसांचं आहे. म्हणून मला वाटत ही मुलाखत देवेंद्र फडणवीस व भाजपावर टीका करण्यासाठी होती. देशाच्या पातळीवर नरेंद्र मोदी यशस्वीपणे काम करत आहेत. देशाचा शत्रू कोण, पाकिस्तान, चीन की, दोन्ही? हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांनी पाच वर्ष काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नका,” अशी टीका राणे यांनी केली आहे.