हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज (बुधवारी) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तमिळनाडूतील वेल्लोर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी “भ्रष्टाचाराचे कॉपीराइटच द्रमुककडे (DMK) आहे” अशी जहरी टीका केली. तसेच, “मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे संपूर्ण कुटुंब मिळून तामिळनाडू लुटण्याचे काम करत आहे. आता द्रमुक पार्टी एक कौटुंबिक कंपनी बनली आहे. जिने तमिळविरोधी संस्कृतीलाही प्रोत्साहन दिले आहे.” असा आरोपही मोदींनी यावेळी केला.
वेल्लोरच्या सभेत पंतप्रधान मोदी डीएमकेवर घणाघाती प्रहार करताना दिसले. यावेळी बोलताना त्यांनी, “द्रमुकला तामिळनाडूच्या जनतेला जुन्या विचारसरणीत, जुन्या राजकारणात अडकवून ठेवायचे आहे. द्रमुकच्या कौटुंबिक राजकारणामुळे तामिळनाडूतील तरुणांना पुढे जाण्याची संधी मिळत नाहीये. द्रमुकमध्ये कौटुंबिक राजकारण, भ्रष्टाचार आणि तामिळविरोधी संस्कृती ही तीन प्रमुख कारणे पुढे जाण्यासाठी आहेत.” अशा शब्दात द्रमुकवर निशाणा साधला.
त्याचबरोबर, “द्रमुक लोकांमध्ये भाषा, प्रांत, श्रद्धा यावरून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. द्रमुकने राज्याचे भवितव्य आणि लहान मुलांनाही सोडले नाही. येथील शाळांमध्येही ड्रग्ज विक्रेते आहेत. एनसीबीने ज्या ड्रग्स रॅकेटला पकडले आहे त्यांचा संबंध स्टॅलिन कुटुंबाशी आहे. मात्र या लोकसभा निवडणुकांमध्ये तामिळनाडूतील जनता द्रमुकच्या पापांचा हिशेब घेणार आहे.” असा थेट आरोप नरेंद्र मोदींनी द्रमुकवर लावला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील वेगवेगळ्या भागात प्रचार करताना दिसत आहेत. या प्रचारादरम्यानच मंगळवारी पंतप्रधान मोदींनी चेन्नईमध्ये एका भव्य रोड शोचे ही नेतृत्व केले. या रोड शोवेळी मोदींकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर बुधवारी नरेंद्र मोदींची वेल्लोर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी द्रमुकवर जोरदार टीका केली.