कोरोनाची लागण झाल्यानंतर पवारांना मोदींचा फोन; तब्बेतीची केली विचारपूस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः पवारांनी ट्विट करत सांगितले. त्यांनतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ शरद पवारांना फोन करत त्यांच्या तब्बेतीची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.

पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीने सगळीकडे खळबळ उडाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना कॉल केला आणि तब्बेतीची चौकशी केली. राजकीय विचारधारा वेगळी असली तरी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे जिव्हाळ्याचे संबंध हे सर्वश्रुत आहेत. एकदा तर एका जाहीर कार्यक्रमात मोदींनी पवारांना आपले राजकीय गुरू मानले होते.

चिंता करण्याचे कारण नाही – पवार

माझी कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. असे ट्विट शरद पवार यांनी केलं.