हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आज लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पुण्यात आल्यानंतर सर्वात प्रथम नरेंद्र मोदींनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर तसेच ते ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळ्यासाठी रवाना झाले. खास म्हणजे पुरस्कार मंचावर पोहोचल्यानंतर त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही (Sharad Pawar) उपस्थित होते. शरद पवारांच्या जवळ पोहोचतात नरेंद्र मोदींनी हस्तांदोलन केली. तसेच या दोघांमध्ये काही सेकंदांचा संवाद देखील झाला. यानंतर झालेल्या संवादावर हसत शरद पवारांनी नरेंद्र मोदींचे पाठ थोपटली.
यावेळी शरद पवारांच्या जवळ असणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंच्या चेहऱ्यावर देखील हास्य फुलले. त्यामुळे या दोघांमध्ये नक्की काय चर्चा झाली यावर आता वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहेत. सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडींमुळे नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी आक्षेप घेतला होता. तसेच मोदींना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. महत्वाचे म्हणजे, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तेढ निर्माण झाली असताना देखील शरद पवार या सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर देखील टीका केली होती. मात्र या सगळ्या टीका टीपणीनंतर शरद पवार नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना वेग आला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रोचे देखील उद्घाटन केलं. त्याचबरोबर पुण्यातील काही विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. आज सकाळी सर्वात प्रथम पुण्यात आल्यानंतर नरेंद्र मोदींनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पुरस्कार सोहळ्यासाठी हजेरी लावली. मोदींच्या पुणे दौऱ्यानिमित्त संपूर्ण प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज होती. तब्बल ५ हजार पोलीस पुण्यात तैनात करण्यात आले होते.