“घराणेशाही जोपासणारे पक्ष लोकशाहीचे शत्रू”; नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या स्थापनेला आज तब्बल 42 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त देशासह अनेक राज्यांत भाजपतर्फे हा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्च्युअली कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. “देशातील सुरु असलेले राजकारण एखाद्या कुटुंबाच्या भक्तीचे आहे. तर दुसरं राजकारण देशभक्तीचे सुरू आहे. भाजपने घराणेशाहीविरोधात बोलायला सुरुवात केली आणि हाच निवडणुकीचा मुद्दा बनवला. घराणेशाहीवाले पक्ष आणि सरकारे देशाचे दुश्मन, शत्रू आहेत, अशी टीका मोदी यांनी केली.

नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “अनेक दशकांपासून काही लोकांनी मतांचं राजकारण केलं. मूठभर लोकांना आश्वासन द्यायचं आणि इतरांना ताटकळत ठेवायचे अशा पद्धतीचे भरत देशात काम सुरू होते. मात्र, ४२ वर्षापूर्वी जेव्हा भाजपची स्थापना झाली. त्यानंतर भाजपने भ्रष्टाचार आणि भेदभावाच्या राजकारणाशी संघर्ष केला. देशावासियांना या राजकारणाचं नुकसान लक्षात आणून देण्यास भाजप यशस्वी ठरली.

आम्ही सध्या देशाच्या विकासासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करत आहोत. सबका साथ, सबका विकास या मंत्राच्या माध्यमातून सर्वांचा विश्वास प्राप्त करत आहोत. 100 वर्षातील या सर्वात मोठ्या संकटाच्या काळातही गरीब लोक भुकेले राहू नयेत यासाठी केंद्र सरकारने 3.5 लाख कोटी रुपये खर्च केले असल्याचेही यावेळी मोदी यांनी सांगितले.