हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 10 जूनला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असून तत्पुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तुरुंगात असलेले आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. मुंबई सत्र न्यायालयाने या दोन्ही नेत्यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
राज्यसभा निवडणूक वेळी मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र ईडी ने त्यांच्या अर्जावर आक्षेप नोंदवला होता. आता थेट कोर्टानेच त्यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना मतदान करता येणार नाही. एक-एक मत महत्त्वाचं असताना हा महाविकास आघाडीसाठी हा धक्का मानला जातो आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस उच्च न्यायालयात याबाबत दाद मागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे 6 व्या जागेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळेल. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना तिकीट देण्यात आले असून भाजपकडून धनंजय महाडिक हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी कडून अपक्ष आणि इतर छोट्या छोट्या पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूकीत कोणाचा विजय होतो हे आता पाहावं लागेल.