हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला होता. शरद पवार हे चारवेळा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय का घेतला गेला नाही? असा सवाल नारायण राणे यांनी काल केला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त प्रतिक्रिया देत, नारायण राणेंवर जोरदार टीका केल्याचे दिसून आले.
अजित पवार म्हणाले, ‘नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी का नाही दिले आरक्षण?, ही काय पद्धत झाली का?… हे इतक्या वेळा मुख्यमंत्री होते, ते इतक्या वेळी मुख्यमंत्री होते. इतर वेळी म्हणायचे की शरद पवार आमचे नेते आहेत. शरद पवार यांचे वाकून दर्शन घ्यायचे आणि नंतर आपण काहीतरी वेगळे सांगतोय असे करून शरद पवार यांच्याबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करायचे.’
शरद पवार यांनी नेहमीच ५० वर्षांच्या राजकीय जीवनात काम करत असताना, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचीच भूमिका घेतलेली आहे. आताही शरद पवार यांची भूमिका हीच आहे, पक्षाची भूमिका हीच आहे. इतर समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. तशा प्रकरचा प्रयत्न शेवटपर्यंत झाला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. नारायण राणेंना समजत नाही का? असा सवाल करत आमचं आघाडी सरकार असताना मीच पृथ्वीराज चव्हाण यांना शिफारस केली होती की, यामध्ये नारायण राणेंना प्रमुख नेमा व त्यांना यामध्ये लक्ष घालायला सांगा.” असंही यावेळी अजित पवारांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.