औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात ; राष्ट्रवादीचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांना कडक शब्दात इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनीही चंद्रकांत पाटलांचा खरपूस समाचार घेतला आहे. औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पाण्याविना मासे तडफडतात तशी राज्यातील भाजप नेत्यांची अवस्था आहे. मात्र, त्यांनी उगाच सत्तेची स्वप्न पाहू नयेत. राज्यात पुढील 15 वर्षे महाविकासआघाडीची सत्ता असेल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले –

अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा पाटील चंद्रकांत पाटील यांनी दिला. तुम्हाला राष्ट्रवादीचे 28 आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं. तसेच अजित पवार यांना सगळीकडेच राहायचे असते. जिथे सरकार तिथे मी असलेच पाहिजे, अशी अजित पवारांची प्रवृत्ती असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.