हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीतील धुसपुस पुन्हा एकदा समोर आली आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून काँग्रेसकडे दुर्लक्ष केलं जात असून शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत सुरू आहे, अशी तक्रार मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू राय यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. विश्वबंधू राय हे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं.
विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, “पक्षाला महाविकास आघाडी सरकारमध्ये एकट पाडलं जात आहे. सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाला वाळवीप्रमाणे हळूहळू संपवण्याचं काम करत आहे. एक वर्षानंतरही काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्षचं सरकार चालवण्याचं काम करत आहेत.”
काँग्रेसचे मंत्री संघटनेच्या काहीच उपयोगी पडताना दिसत नाहीत. सामान्य जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांना तर काँग्रेसच्या मंत्र्यांची खातीच माहिती नाही. काँग्रेसचं नुकसान करण्यावर आणि स्वत:चा पक्ष बळकट करण्यावर मित्र पक्षांनी जोर दिला आहे. मित्र पक्षांचा हा डाव रोखण्यात काँग्रेसला अपयश येत आहे. असंही त्यांनी म्हंटल आहे.
राय यांच्या या पत्रामुळे आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम स्थान मिळत असल्याचा रोखच या पत्राचा असल्याने काँग्रेस नेत्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्हं निर्माण होत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. दरम्यान, या पत्रावरून काँग्रेसमधून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’