राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट; पत्र देत सत्तारांबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

NCP Bhagatsih Koshari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले. सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अब्दुल सत्तारांवर चांगलीच टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची आज भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी राज्यपालांना पत्र दिले असून अब्दुल सत्तारांना दिलेल्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या आणि त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा, अशी मोठी मागणी केली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की,”छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथली माती, इथली संस्कृती आणि परंपरा ही आईसमान समजली जाते. स्त्रित्वाचा आदर करून स्त्री सन्मानाचा पुरस्कार करणारा महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे.

राजमाता जिजाऊ, सावित्रीदेवी फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि माता रमाईच्या लेकींचा महाराष्ट्र म्हणून अभिमानाने गौरविला जातो. परंतु या आदर्शवत स्त्रियांच्या संस्कारांना काळिमा फासण्याचं काम आज महाराष्ट्रात झालं आहे. पवित्र अशा संविधानाची शपथ घेऊन मंत्री म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल उच्चारलेले आक्षेपार्ह शब्द व केलेलं वक्तव्य याचा आम्ही जाहीरपणे तीव्र शब्दात निषेध करतो.

सदर विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासून स्त्रित्वाचा अपमान करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना तातडीनं बडतर्फ करावं. आपण महाराष्ट्राच्या लेकींना नक्की न्याय मिळवून द्याल याची मला खात्री आहे”, असं राज्यपालांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटलेलं आहे.