राज ठाकरेंची सभा भाजप पुरस्कृत; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकामागून एक सभांचा धडाका लावला असून ते सातत्याने महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. विरोधकही राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सभा या भाजप पुरस्कृत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. ईडीची पीडा टाळण्यासाठीच त्यांचा खटाटोप सुरु आहे असेही त्यांनी म्हंटल.

धनंजय मुंडे म्हणाले, यापूर्वी राज ठाकरे भाजपवर टीका करायचे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह याना पदावरून हटवा असं राज ठाकरेच म्हणायचे, तेच राज ठाकरे आज भाजपचे गुणगान गात आहेत. ईडीची पीडा टाळण्यासाठी ते भाजपला खुश करत आहेत. पण त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी महाविकास आघाडीला काहीही फरक पडणार नाही.

दरम्यान, राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जंगी सभा होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता राज ठाकरे यांचे भाषण होईल. मनसेचे राज्यातील नेते आणि कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेसाठी औरंगाबादला दाखल झाले आहेत. राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार?? कोणावर निशाणा साधणार याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे