महाविकास आघाडी तोडण्याचे काम राष्ट्रवादीने केले, शिवसेना- काॅंग्रेस एकत्र : आ. महेश शिंदे

सातारा | सातारा जिल्ह्यात जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने पहिल्यांदा राष्ट्रवादी पक्षाने महाविकास आघाडी तोडण्याचे काम केले. जिल्हा बॅंकेत आम्ही त्यांना दोन जागा मागितल्या होत्या, परंतु त्यांनी आम्हांला जाणीवपूर्वक डावललं. तरीही शिवसेनेच्या तीन जागा आल्या. राष्ट्रवादी जिल्ह्यात केवळ त्याच्या फायद्याच्या ठिकाणी आम्हांला घेणार असतील तर आमच्या फायद्याच्या ठिकाणी त्यांना घ्यायचा प्रश्नच येत नाही. आम्ही काॅंग्रेसला घेवून चाललो असल्याचे कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले.

कोरेगाव येथील नगरपंचायतीच्या 17 जागेपैकी 13 जागेसाठी यापूर्वीच मतदान झाले आहे. तर उर्वरित 4 जागांसाठी मतदान प्रक्रिया आज सुरू आहे. त्यानिमित्ताने आ. महेश शिंदे आणि आ. शशिकांत शिंदे यांनी नेत्यांनी मतदानांच्या ठिकाणी ठाण मांडले होते. यावेळी आ. महेश शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आ. महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव नगरपंचायत ही आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. मतदारांच्यात उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही गेल्या दोन वर्षात कोरेगाव शहर व तालुक्यात केलेल्या कामामुळे सत्ता परिवर्तन होणार हे निश्चित आहे.जे जनतेचे प्रश्न सोडवतात, जनतेत राहतात त्याच्यासाठी कष्ट करतात त्यांना सहानभूती मिळते. कोरेगाव विकास परिवर्तन पॅनेलमध्ये शिवसेना आणि मित्रपक्षाचे पॅनेल आहे. विकासकामांच्या जोरावर कोरेगाव नगरपंचायतीत सत्तापरिवर्तन दिसेल.