.. मग अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधी नैतिक होता काय? खडसेंचा चढला पारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. गेली ४० वर्षे भाजपाला राज्यात वाढवणाऱ्या खडसेंच्या पक्षांतराच्या निर्णयावर भाजपमधून नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत . त्यांच्या निर्णयाला अनैतिक म्हटलं जात आहे. अशा वेळी खडसे यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक हा कोणता न्याय आहे अशी विचारणा त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

“विधानसभेनंतर शिवसेनेसोबत युती केली असतं तर सरकारमध्ये आलो असतो. राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यापेक्षा शिवसेनेसोबत युती केली असती तर कदाचित दोघं राज्यात आले असते. अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक हा कोणता न्याय आहे,” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

भाजप स्थापन झाल्यापासून पक्षाचं काम एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलं. त्या कालखंडात परिस्थिती फार अवघड होती. आणीबाणीनंतर भारतीय जनता पार्टीची जेव्हा सुरुवात झाली. तेव्हा ती जनमानसात रुजलेली नव्हती. कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी नव्हते. त्यावेळी गावागावांत उपेक्षा सहन करावी लागायची. पण सर्वांच्या मेहनतीने भाजपला आज अच्छे दिवस आले. त्याचा मला नेहमी आनंद राहिला

राज्यात भाजपचे सामूहिक नेतृत्व संपले
पूर्वीच्या कालखंडातील आमचे नेते सामूहिक नेतृत्वाच्या अनुषंगाने काम करायचे. सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय व्हायचा. तो सर्वांकडून मान्य करुन निर्णय व्हायचा. पण अलिकडच्या काळात भाजप व्यक्तीगत आहे. एकाच व्यक्तीने निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशा स्वारुपाची आहे. निर्णय आधीच ठरलेला असायचा, फक्त नावापुरता विचारलं जायचं.

‘फडणवीसांना विलन ठरवलं नाही’
मी फडणवीसांना विलन ठरवलं नाही. कोणत्याही निर्णयाचे चांगले-वाईट परिणाम होतात. चांगले परिणाम झाले तर गुणगाण होतं. जे वाईट झालं ते नेतृत्वाने का स्वीकारु नये? अलिकडच्या काळात माझ्यासोबत व्यक्तीगत घटना घडल्या आहेत त्या वेदनादाय होत्या. माझ्या चौकश्या केला. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. याचा मला प्रचंड मनस्ताप झाला.

फडणवीस जोपर्यंत पक्षात आहे, तोपर्यंत मला न्याय नाही
“देवेंद्र फडणवीस जोपर्यंत पक्षात आहे, तोपर्यंत मला न्याय मिळणार ;अशी माझी भावना झाली, म्हणून मी पक्ष सोडला. मी पक्षाला दोष दिला नाही, नेतृत्वाला दिला. एकाही नेत्याने भाजपा सोडणार कळाल्यावर फोन केला नाही. चार दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी फोन केला. मी अमित शाह, पंतप्रधान मोदी यांनाही भेटलो,” अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

म्हणून मी ‘हा’ निर्णय घेतला
“अनेक लोक भाजपामध्ये नाराज आहे, चंद्रकांत पाटीलही आता स्वत: निर्णय घेऊ शकत नाही, त्यांनाही फडणवीसांना विचारुन निर्णय घ्यावे लागतात,” असा गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे. “शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिघांकडून मला ऑफर होत्या, पण राष्ट्रवादीत या ठिकाणी विस्ताराला वाव आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला,” असं खडसेंनी सांगितलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment