हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संजय राऊत यांच्या मध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत सेफ जागेवरून निवडणूक लढवावी असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटलांना फटकारत त्यांचा खरपूस समाचार घेतला.
चंद्रकांत पाटील यांना ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतः चे गाव राखता आलं नाही आणि ते संजय राऊत यांना कसलं आव्हान देतायत असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला. तसेच चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर केलेल्या टिकेलाही त्यांनी प्रत्युत्तर देत इथून पुढे पवारांबद्दल केलेलं वक्तव्य आम्ही सहन करणार नाही असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.
दरम्यान राज ठाकरे- चंद्रकांत पाटील यांच्या भेटीबद्दल विचारले असता मुश्रीफ म्हणाले की, ही भेट फिक्स होती की काय माहीत नाही परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेवरून महाराष्ट्रातील तरुण वर्ग हा नाराज आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले-
जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी राऊतांची खिल्ली उडवत महापालिकेची निवडणूक लढवा, असं चॅलेंज राजसाहेबांच्या अंगणातूनच दिलं.