व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच नंबर 1 ; पवारांनी आकडेवारीच दाखवली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यांनतर भाजप आणि शिंदे गटाकडून आम्हीच सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा करण्यात येत आहे, त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट आकडेवारीच दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर १ असल्याचे सांगितले. मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, आमच्याकडे असलेल्या अधिकृत माहितीनुसार महाविकास आघाडीला भाजप आणि शिंदे गटापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. एकूण ६०८ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने १७३, काँग्रेसने ८४, भाजपाने १६८ आणि शिंदे गटाने ४२ ठिकाणी विजय मिळवला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची अधिकृत आकडेवारी आम्हाला मिळालेली नाही. पण जवळपास २७७ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर शिंदे गट आणि भाजपाला मिळून २१० जागी विजय मिळाला आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. आम्हीच सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या हा भाजपचा भ्रम आहे. तसेच त्यांना त्यांच्या भ्रमात राहूद्या असा टोलाही पवारांनी लगावला.

दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी भाजपने शरद पवारांवर आरोप केले आहेत त्याबाबत विचारलं असता त्यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले. याप्रकरणी जी चौकशी करायची ती करा पण जर माझ्यावरील आरोप खोटे निघाले तर आरोप करणाऱ्यावर काय कारवाई करणार हे सुद्धा राज्य सरकारने जाहीर करावे, असे प्रति आव्हान शरद पवारांनी भाजपला दिले.