कोल्हापूर । राज्यात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर दिली असल्याचे समजत आहे. जयंत पाटील आज राजू शेट्टींच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ इथल्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी ही ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, या ऑफरबाबत राजू शेट्टी यांना विचारलं असता ते म्हणाले की, “प्राथमिक चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्याशी यासंदर्भात थेट बोलणं झालेलं नाही. जयंत पाटील माझ्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते, त्यावेळी आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. यापुढे अजूनही चर्चा होणार आहे.” असं सपष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिलं आहे.
राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीने हालचाली सुरु केल्या आहेत.जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना राजू शेट्टीचे राजकीय विरोधक सदाभाऊ खोत यांना भाजपने आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची जागा दिली होती. तशीच ऑफर राजू शेट्टींना देण्यात आली आहे. त्यामुळे राजू शेट्टी काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. दरम्यान, विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त एकूण 12 जागा भरायच्या आहेत. त्यामधील किमान चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे शेट्टी यांच्यासारखा अनुभवी नेता विधानपरिषदेत जावा अशी शरद पवारांची भूमिका असल्याचं कळतं.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in