हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी भूंकप झाल्यानंतर काका शरद पवार स्वत: मैदानात उतरले. काकानंतर आता पुतणे अजित पवार देखील सक्रीय झाले असून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेल्या अजितदादा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आज रायगडमधील कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिबीर पार पडले. या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघासह शिरूर, सातारा आणि रायगड या ठिकाणी लोकसभा निवडणुका आपल्या गटातील उमेदवार उभे करून लढवणार आहोत, अशी घोषणा केली.अशा प्रकारची घोषणा करत अजितदादांनी काका शरद पवार यांच्यासह खासदार श्रीनिवास पाटील यांना थेट आव्हान दिले आहे.
सातारा हा राष्ट्रवादीचा 1999 पासून बालेकिल्ला आजतागायत अबाधित राहिला आहे. पण अजित पवार यांच्या बंडानंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या व उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांनी आपल्या गटाकडून आता ताकद वाढवण्यासाठी मंत्र्यांना राज्यातील जिल्हे विभागून देण्यात आले आहेत. यामध्ये अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे.
आज कर्जत येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका खा. शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या वर निशाणा साधला. खास करून महाराष्ट्रातील जागा लढवण्यामध्ये अजित पवारांनी सातारच्या जागेबाबत देखील घोषणा करून टाकली. सातारा लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थिती लढवणार असल्याचे अजितदादांनी सांगितले. त्यामुळे खा. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील अथवा इतर कोणत्याही उमेदवार विरोधात आता अजितदादा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शरद पवार यांचा सातारा आहे अत्यंत लाडका जिल्हा
सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर प्रामुख्याने खासदार शरद पवार व अजित पवार यांचा पगडा राहिला आहे. शिवाय अजित पवार यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण वर्गावर त्यांचा प्रभाव आहे. मात्र, खा. शरद पवार यांचा सातारा हा अत्यंत लाडका असा जिल्हा आहे. ज्यावेळी शरद पवारांनी पक्षाची स्थापना केली त्यावेळी 9 आमदार व 2 खासदार या जिल्ह्याने दिले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्याने भरभरून मतदान देखील केले आहे.
श्रीनिवास पाटील यांच्यासाठी पवारांनी घेतली होती भरपावसात सभा
दरम्यान, 2019 मध्ये उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेली भरपावसातील सभा विशेष गाजली. या सभेमुळे निवडणुकीचा निकाल पालटला होता. शरद पवार साताऱ्यात असताना, श्रीनिवास पाटील यांच्या प्रचाराच्या भाषणावेळी धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यावेळीही शरद पवारांनी पावसाचा विचार न करता, आपल्या मित्रासाठी चक्क पावसात भाषण केलं आणि सभा गाजवली. त्याचा परिणाम असा झाला की उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला आणि श्रीनिवास पाटील खासदार झाले.
सातारच्या सभेवरून काकांवर साधला निशाणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीकर्जत येथील सभेतून काका खा. शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. काहीजणं पावसात भिजण्याचं नाटक करतात, असा जोरदार हल्लाबोल पवार यांच्यावर केला.