हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला टोला लगावला आहे. “शाहरुख खानच्या मुलाला अटक करण्यात आल्यानंतर त्याबाबत भाजपकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. उद्या जर समजा शाहरुख खानने भाजपमध्येच प्रवेश केला तर हे भाजपवाले व एनसीबीवाले कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील, असा टोला भुजबळ यांनी लगावला आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीड येथील एका मेळाव्याच्या कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात कोणावरही धाडी टाकण्याचा प्रकार केला जात आहे. शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर येथे कोकेन नाही तर पीठ सापडले असे म्हणतील. सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले जात आहे.
यावेळी मंत्री भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बैठक घेत होते. या घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर आरोप झाले. 100 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप झाले. पाच फुटाच्या म्हशीला 15 फुटाचा रेडकू कसे होईल? आमच्या घरावर 17 वेळी धाडी टाकण्यात आल्या. आमच्या पत्नी, मुले घाबरून मॉलमध्ये जाऊन बसायचे. तो काळ विचित्र होता. अजित पवारांच्या बहिणीच्या घरीही धाडी घातल्या.