गोपीचंद पडळकर यांना ‘त्या’ विधानासाठी गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल- जितेंद्र आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली. “असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल,” असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

“शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलं आहे,” असंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.

“आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी काहीतरी बोललं पाहिजे. पवारांबद्दल बोललं की महान नेता असा भाजपात गोड समज आहे. त्यामुळे हा त्या प्रयत्नाचा भाग आहे. हे ज्यांना नेता मानतात तेच नरेंद्र मोदी आपण शरद पवारांची करंगळी धरुन राजकारणात आल्याचं बोलतात. यांना करंगळी धरायला मिळणार नाही,” असा टोला यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. “सहा-आठ महिन्यापूर्वी गोपीचंद पडळकर राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावत होते. मला घ्या अशी विनंती करत होते,” असा गौप्यस्फोटही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment