हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी २ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी आज धक्कादायक खुलासा केला आहे. “क्रूझवर झालेल्या त्या ड्रग्स पार्टीत भाजपच्या एका नेत्याचा मेव्हणाही होता. त्या भाजप नेत्याच्या मेव्हण्याला एनसीबीने का सोडले? याचे उत्तर द्यावे, असा सवाल मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुंबईत क्रुझवर एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये 10 लोकांना पकडण्यात आले होते. मात्र, त्यापैकी 2 लोकांना सोडण्यात आले. जे दोन जण सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा होता. त्याबाबत उध्या सविस्तर स्वरूपात माहिती देणार आहे.
ज्यावेळी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यातही आले. मात्र, त्याची काही माहिती एनसीबीकडून देण्यात आली नाही. आपला सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले का? असा सवालही यावेळी मलिक यांनी उपस्थित केला आहे.