हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजपचा राजीनामा दिल्यानंतर सगळीकडे राजकिय खळबळ उडाली आहे. त्यावर प्रतिक्रिया उमटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यावर सूचक विधान केलं आहे. ‘एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है’, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपमधील आणखी काही नाराज नेते लवकरच महाविकास आघाडी मध्ये परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं. एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है, असं सांगतानाच आगामी काळात भाजपमध्ये गेलेले काठावरचे अनेक नेते राष्ट्रवादीत येतील. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढण्यात मदतच होणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. मुश्रीफ यांनी भाजपमधील अनेकजण राष्ट्रवादीत येणार असल्याचं सांगितल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशा बद्दल घोषणा केली होती. एकनाथ खडसे यांनी आज सकाळी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत. त्यांचा पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात नव्हे तर उजेडात होईल, असं जयंत पाटील म्हणाले होते. शुक्रवारी दुपारी 2 वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’