हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देवगिरी या निवासस्थानी पक्षातील बड्या आमदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल हे दोन्ही कार्याध्यक्ष सुद्धा उपस्थित आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत ही बैठक बोलवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बैठकीला कोण कोण उपस्थित?
या बैठकीला सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या शिवाय धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, दौलत दरोडा, अमोल कोल्हे, किरण लामहाटे, मकरंद पाटील, अतुल बेनके हे नेते उपस्थित आहेत. अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी त्यांच्या या समर्थक आमदारांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील मात्र या बैठकीला उपस्थित नाहीत. काही दिवसांपूर्वी आपल्याला विरोधी पक्षनेते पदात रस नसून संघटनेत काम द्या अशी मागणी अजित पवारांनी केली होती, तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडीना वेग आला आहे.
6 जुलैला शरद पवारांनी बोलावली बैठक
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरू असलेल्या एकूण सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 6 जुलैला बैठक बोलावली आहे. परंतु त्यापूर्वीच अजित पवार समर्थक आमदारांची बैठक सुरू झाल्याने चर्चाना उधाण आले आहे.
जयंत पाटलांचे पद जाणार??
राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. अजित पवारांनी संघटनेत पद द्या अशी मागणी केल्याने अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्ष पदावरच दावा ठोकला होता. त्यामुळे जयंत पाटील यांच काय? असा प्रश्न निर्माण झाला. 2 दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही. मात्र, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यपदाबाबतच चर्चा केल्याचं समजत आहे.