हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांची नावे माझ्याकडे आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यावर मी ठाम आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या बैठकीत मी हा विषय मांडणार आहे. त्याबाबतचा रिपोर्ट अजित पवार यांनाही देणार आहे, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना नाव न घेता दिला.
कोरेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने मिळवलेल्या विजयानंतर ल्हासुर्णे येथील निवासस्थानी आ. शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर करणाऱ्यांनीच आमच्यावर बाजार समितीच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप करणे हास्यास्पद व बालिशपणा आहे.
या निवडणुकीत रामराजे नाईक- निंबाळकर, मी, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, नितीन पाटील, सुनील माने यांच्यासह आमचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने लढले. या निवडणुकीतील विजयामुळे कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे. त्यांच्यात उत्साह निर्माण झाला असल्याचे शिंदे यांनी म्हटले.