हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी उडाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी असल्याचा आरोप दरेकरांनी केल्यानंतर नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नवाब मलिक म्हणाले, प्रवीण दरेकर यांनी इतिहास समजून घेण्याची गरज आहे. मजूर सोसायटी मध्ये घोटाळा करणे आणि इतिहास समजणे वेगळी गोष्ट आहे. जर दरेकर इतिहास समजून घेऊ शकत नाहीत, तर राष्ट्रपतींना इतिहास विचारा असता सल्ला देत जर मी काही चुकीचे बोललो असेन, तर भापजपने राष्ट्रपती भवनासमोर ठिय्या आंदोलन करावे असे आव्हान नवाब मलिक यांनी दिले.
नेमकं काय आहे प्रकरण-
मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. याच दरम्यान टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते असे विधान नवाब मलिक यांनी केलं. टिपू सुलतान कधीही इंग्रजांना शरण गेले नाहीत. इंग्रजांशी लढाई करतानाच ते शहीद झाले होते असे मलिक यांनी म्हंटल. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी यावर प्रत्युत्तर देताना मलिक हे हिंदु द्वेष्टी असल्याचा आरोप केला होता. तसेच या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी असे आवाहन त्यांनी केलं.