हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मनसे आणि भाजप युतीचे हे स्पष्ट संकेत तर नाहीत ना अशीही शंका उपस्थित होत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा अन्य कुठलेही नेते असोत प्रत्येकाची आस्था असते. या देशात प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे. हा प्रत्येक नागरिकाचा मौलिक अधिकार आहे. त्यामुळे ते त्यांना हवं त्याठिकाणी जाऊ शकतात, असे मलिक यांनी म्हटले.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने आता राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. याविषयी विचारणा केली असता नवाब मलिक यांनी, कोणी कोणासोबत युती करावी, हा त्यांचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’