Wednesday, February 8, 2023

दोन हाणा, पण मला आपलं म्हणा; पदाधिकाऱ्याचा अजितदादांकडे जाहीर माफीनामा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने वर्तमानपत्रातून जाहीर माफी मागितली. नितिन हिंदुराव देशमुख असे पदाधिकाऱ्यांचे नाव असून पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे नितिन देशमुख यांच्यासोबत अजित पवार अद्यापही बोलले नाहीत. मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्याला माफ करुन अबोला सोडावा, अशी गळ देशमुखांनी घातली आहे.

गतविधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेचा तिढा असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होता. या पहाटेच्या शपथविधीनंतर नितीन देशमुखांनी वाय बी चव्हाण येथे अजित दादांविरोधात घोषणाबाजी केली होती. नितीन देशमुख यांच्या भूमिकेबद्दल अजितदादांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

- Advertisement -

दरम्यान नितीन देशमुख यांनी अजित पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दादांच्या मनधरणीचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. दोन हाना, पण मला आपलं म्हणा, मला माफी, हेच तुमचं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, अशी जाहिरात नितिन देशमुख यांनी वर्तमानपत्रात दिली आहे.

काय आहेत जाहिरात?

आदरणीय दादा…
आम्ही अपराधी अपराधी
आम्हा नाही दृढ बुद्धी
तरी साहेबी पांघरले माझ्या चुकांवर पांघरुण
हात ठेवुनी मस्तकी आता द्यावा आशीर्वाद
अन् असावी आम्हावर मायेची पखरण

दादा, तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक, माफ करा…
तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल नव्हता इरादा
23 नोव्हेंबर 2019 रोजी माझ्या हातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या
दादा, मी अपरिपक्व होतो, भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली
दोन वर्षे मी स्वतःला पश्चातापाच्या अग्निकुंडात झोकून दिले आहे
पण दादा, आता सहन होत नाही
संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छारुपी
आदरभाव व्यक्त करतोय, मलाही दादा आज मन मोठं करुन
आशिर्वादरुपी माफीचं रिटर्न गिफ्ट द्या..
एवढीच माफक अपेक्षा
– आपला कृपाभिलाषी नितीन हिंदुराव देशमुख