हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर सध्या त्यांच्या दौऱ्यावरून व 12 आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी सरकारकडून टीका करण्यात आली आहे. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बारा आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांवर निशाणा साधला. “राज्यपाल म्हणाले सरकार मागणी करत नाही तर तुम्ही का विचारताय. पण पत्र कधीच गेलेले आहे, वाढत्या वयामुळे त्यांच्या पत्र पाठविल्याचे लक्षात आले नसेल,”असे सांगत पवारांनी टोला लगावला आहे.
राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहे. याच दरम्यान त्यांच्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला. यावेळी पवार म्हणाले की, मी राज्यपाल सिंग कोश्यारी यांचे भाषण ऐकले आहे. त्यांचे भाषण ऐकल्यावर एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सरकार मागणी करत नाही तुम्ही का विचारताय? मात्र, पत्र गेलेले आहे. वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आले नसेल. त्यांनी आधी पत्र दिले, त्यानंतर शिष्टमंडळही भेटून आले. आपल्याकडे म्हण आहे, “शहाण्यांना शब्दाचा मार, आणि…” अशा शब्दात पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना टोला लगावल्यामुळे राजकीय वर्तृलाट याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. पवारांच्या टोलेबाजीनंतर आता याला भाजपमधील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहावे लागेल.