हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र डागळे जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून राज्यांना आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, जेवणाचे निमंत्रण देऊन हात बांधल्यासारखे करणे, असा प्रकार करीत केंद्राकडून ओबीसींची फसवणूक केली जात असल्याची टीकाही पवारांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते पुढे म्हणाले की, केंद्रसरकारने नुकतेच एक विधेयक मंजूर केले. त्या विधेयकाच्या मंजूरीनंतर केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे आरक्षणासाठी सरकारने पाऊल टाकले असा लोकांचा गैरसमज झाला. ही ओबीसींची शुद्ध फसवणूक आहे.
वास्तविक, नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार याबाबत आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला होता. त्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात येणार नाही, असं सांगितले होते. केंद्राने नंतर घटना दुरुस्ती करून 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. राज्यांना ओबीसींची यादी तयार करून आरक्षणाचा निर्णय घेऊ शकता, असे केंद्राने भूमिका मांडली आणि दुरुस्ती केली. पण त्याचा काही उपयोग होणार नसल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली आहे.