हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या मालमतेवर छापेमारी करण्याचे काम केले जात आहे. या छापेमारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. पुतण्या “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल”, असा हल्लाबोल पवार यांनी भाजपवर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट झाले पाहिजे, तिथे राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान झाला पाहिजे, अन्यथा स्वतंत्र लढूया, असा इशाराही यावेळी पवार यांनी मित्र पक्षांना दिला आहे.
केंद्र सरकारविरोधात पवार म्हणाले की, आज केंद्र सरकार काय करतंय? या सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस आहे. या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात. मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली आहे.