सरकार पाडण्यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावेत ; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर केला असताना कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला खडेबोल सुनावलं आहेत. सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

रोहित पवारांनी आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे विरोधकांवर निशाणा साधला. लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत. केंद्र सरकारच्या गृहितकानुसार वेस्ट रेट हा १०% असू शकतो,पण आपण तो अवघा ३% ठेवला. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा. असा सल्ला रोहित पवारांनी दिला.

वास्तविक आपण लसीकरणाचा वेग वाढवलाय. लसीकरण केंद्रावर नोंदणी केल्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटात लस दिली जातेय. पण मागणीच्या प्रमाणात पुरवठा लस उपलब्ध नसल्याने लसीकरणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग अजून किती वाढवायचा? केंद्राकडून लसींचा पुरवठा वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे राजकारण आहे का? राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का? या प्रश्नांची उत्तरं राज्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी द्यावीत! असे रोहित पवार म्हणाले.

केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली, हे सांगायची आता वेळ नाही. योग्य वेळी ते जनतेला नक्की कळेल. सध्या राज्याला संकटातून बाहेर काढायची वेळ आहे. त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते नक्कीच हातभार लावतील, ही अपेक्षा.

विरोधी पक्षाला विनंती आहे की, किमान संकट काळात तरी राजकारण करू नका. सरकार पडणार नाहीच पण ते पडावं यासाठी आपण जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावेत. संकटकाळी जनतेसोबत, सरकारसोबत उभं रहावं. महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील!

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment