हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोघांत तब्बल साडेतीन तास चर्चा झाल्यानंतर तर्क वितर्काना उधाण आले. या भेटीत देशातील राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचं समजत असून 2024 मध्ये भाजपला मात कशी देता येईल? आणि भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र कसे आणता येईल याचा टॉप फॉर्म्युला प्रशांत किशोर यांनी पवारांना दिल्याचं समजत आहे.
भाजपला लोकसभा निवडणुकीत 400 जागांवर मात देता येऊ शकत असल्याचं प्रशांत किशोर यांनी पवारांना दाखवून दिलं आहे. त्या जागा कोणत्या, कोणत्या राज्यात किती जागा आहेत, त्या राज्यात कोणते प्रादेशिक पक्ष मोठी भूमिका बजावू शकतात, याची आकडेवारीच प्रशांत किशोर यांनी पवारांना दिली आहे. एकट्याच्या बळावर काँग्रेस भाजपला हरवू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन चालल्याशिवाय पर्याय नाही, असंही त्यांनी या बैठकीत पवारांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान शरद पवार यांचे अन्य राज्यातील प्रादेशिक पक्षांसोबत अंत्यत चांगले संबंध आहेत. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, मायावती, लालूप्रसाद यादव, चंद्राबाबू नायडू हे पवारांच्या ऐकण्यातील आहेत. त्यामुळे आगामी काळात देशातील सर्व विरोधकांची एकत्रपणे मोट बांधून पवार भाजपला चारीमुंड्या चित करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.