हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवरील कारवाईचे थेट संकेत दिले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडे हे बुधवारी मला भेटले. मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला सविस्तर माहिती दिली. त्यानुसार धनंजय मुंडे यांचे काही व्यक्तींशी संंबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल, याची कल्पना धनंजय मुंडे यांना होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे आता याप्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
आता धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत बोलायेच झाल्यास ते गंभीर स्वरुपाचे आहेत. एक पक्ष म्हणून या सगळ्याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. पक्षातील प्रमुख सहकाऱ्यांशी माझं अद्याप बोलणं झालेलं नाही. मात्र, मी त्यांना विश्वासात घेऊन धनंजय मुंडे यांनी मला दिलेली माहिती त्यांच्यापुढे मांडणार आहे. त्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यासाठी फार वेळ लागणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तातडीने निर्णय घेईल, असेही शरद पवार यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’