हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची यांची भेट घेणार असल्याचे समजते आहे. नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आलेली असून, सहकार खात्याशी संबंधित कामासंदर्भात पवार शाह यांना भेटणार असल्याचं वृत्त आहे. महत्त्वाचं म्हणजे 15 दिवसांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते अमित शाहांची भेट घेणार आहेत.
यापूर्वी शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. जवळपास 57 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली होती. राजधानी दिल्लीत साऊथ ब्लॉकमधल्या पंतप्रधान कार्यालयात दोघांची भेट झाली होती
शरद पवारांनी गेल्या काही दिवसात, अल्पकाळात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. शरद पवार हे 17 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते. त्यानंतर वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.