हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या यांच्या सूनेला सीबीआयने अटक वॉरंट जारी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार हे मुघलांचे सरकार आहे अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील महाविकास आघाडी सरकार कडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. यावेळी त्या बोलत होत्या.
केंद्रातील सरकार हे मुघलांचे सरकार आहे. छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात टाकला नाही. छत्रपतींनी नेहमी महिलांचा मानसन्मानच केला आहे. या मुघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास आपण पाहिला आहे. अर्थात हे मुघलांचं राज्य चाललं आहे. महिलांचा मानसन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
दरम्यान, लखीमपूरच्या हिंसेच्या विरोधात आम्ही हा महाराष्ट्र बंद पुकारला आहे. लखीमपूरमध्ये लोकांचा खून त्या मुलाने केला आहे त्याविरोधात आम्ही उभा राहिलो आहे. आजही तो व्हिडिओ पाहिला की तळपायाची आग मस्तकात जाते. क्रूर अशी ही घटना आहे. त्याला अटक करण्यासाठी वेळ लागला. त्याला शिक्षा व्हायला हवी. तसंच केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटल.